गडकरींच्या कानपिचक्या : १०६व्या दीक्षांत समारंभात झाले विचारांचे मंथन
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर
'विद्यापीठातील लोकांनी राजकारण करू नये. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाने विद्यापीठांमध्ये राजकारण आणू नये. राजकारण करायचे असेल तर ते विद्येच्या मंदिराबाहेर करावे, त्यांनी बाहेर लढावे. आम्ही तिथे आहोत', अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठातील प्राधिकारणी सदस्य, राजकीय पक्षांच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०६व्या दीक्षांत समारंभात नितीन गडकरी बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. प्रमुख अतिथी म्हणून एचसीएलचे संस्थापक पद्मश्री शिव नादर उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नीरज खटी, वित्त अधिकारी डॉ. राजू हिवसे व व्यवस्थापन परिषद सदस्य आणि विद्याशाखांचे अधिष्ठाता व्यासपीठावर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, 'देशात रोजगार निर्माण करणाऱ्या अर्थकारणाची आज आवश्यकता आहे. नोकऱ्या अल्पप्रमाणात आहेत, तर रोजगार असंख्य आहेत. त्यामुळे विद्यापीठांनीदेखील रोजगार निर्माण करणारे विद्यार्थी तयार करायला हवेत. शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार व प्रसार झाला. परंतु, त्यातील गुणवत्तेचे काय, हा प्रश्न उरतोच. १९८४नंतर राज्यात उच्चशिक्षणात कायम विनाअनुदानित कॉलेजेस सुरू करण्यात आले. उच्चशिक्षणासाठी निधी देण्यास सरकारच्या मर्यादा होत्या. त्यामुळे खासगी गुंतवणुकीतून शिक्षण देण्याचे धोरण अवलंबिले. काही संस्थांनी उत्तम कॉलेजेस स्थापन केलेत, परंतु ज्या संस्थांनी गुणवत्ता राखली नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत नागपूर विद्यापीठाने दाखविली आहे. त्यामुळे शिक्षणाच्या प्रचारासोबतच गुणवत्तादेखील राखली गेली पाहिजे.'
नागपूर विद्यापीठाच्या क्षेत्रात प्रचंड आर्थिक विकास होतो आहे. मिहानमध्ये एचसीएल, इन्फोसिस यांसारख्या अनेक कंपन्या येत आहेत. त्यांना मोठ्या संख्येने कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तेव्हा विद्यापीठाने या उद्योगांसोबत सुसंवाद, सहकार्य आणि सहयोग स्थापित करणे आवश्यक आहे. अभ्यास मंडळांमधून आवश्यक असणारे कोर्सेस तयार झाले पाहिजेत. नागपूर विद्यापीठाने विदर्भाचे ग्रोथ इंजिन म्हणून योगदान द्यायला हवे, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली.
एचसीएलचे संस्थापक शिव नादर यांनी एचसीएलच्या स्थापनेचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. ते म्हणाले, 'दिल्लीत डीसीएम कंपनीत काम करीत होतो तेव्हा भारतात प्रथमच कम्प्युटर आला होता. त्यातून कल्पना घेत एचसीएलची स्थापना करण्यात आली. आज एचसीएल फायटर विमानांच्या सॉफ्टवेअरपासून विविध क्षेत्रांत योगदान देत आहे. भारत सरकारनेदेखील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला पोषक असे वातावरण तयार केले. धोरणात केलेल्या सुधारणांमुळे आयबीएमसारख्या कंपन्या आज भारत सोडून निघून गेल्या आहेत. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी एचसीएलसारख्या कंपन्यांना भरून काढता आली आहे. एचसीएलने आता कम्प्युटर उत्पादन व इतरही उपकरणे उत्पादित करणे सुरू केले आहे.'
भारतात माहिती-तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होतो आहे. परंतु, या क्षेत्राची मागणी पूर्ण करण्यासाठी आपण आजपासूनच भावी पिढीच्या प्रशिक्षणाची सोय केली नाही तर कुशल मनुष्यबळाचा अभाव ही फार मोठी समस्या ठरणार आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी एचसीएलने एका खोलीत प्रशिक्षण वर्ग सुरू केले होते. या उपक्रमाला पुढे नेणाऱ्यांनी नंतर एनआयआयटीची स्थापना केली. त्यामुळे आज जगभरातील आयटी प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी सक्षम झालो आहोत, असेही नादर यांनी नमूद केले.
प्रारंभी, कुलगुरू डॉ. काणे यांच्याहस्ते विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील डीएससी या पदवीने डॉ. आनंद गोविंद भोळे यांना सन्मानित करण्यात आले. तर विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पद्मश्री शिव नादर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुलगुरू डॉ. काणे यांच्या हस्ते पदके व पारितोषिके प्रदान करण्यात आले.
शिक्षण बाजारू बाब नाही : कुलगुरू
'संलग्नित कॉलेजेसचे काम पूर्ण क्षमतेने होत आहे की नाही, ते तपासण्यासाटी कॉलेजेसचे अॅकेडमिक ऑडिट करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. अकार्यक्षम कॉलेजेसची मान्यता रद्द करण्याचे कामही विद्यापीठाने सुरू केले आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाचे स्वागतच होत आहे. शिक्षण ही काही बाजारू बाब नाही. एका विशिष्ट शिस्तीतच काटेकोरपणे पार पाडण्याची ती प्रक्रिया आहे. अकार्यक्षम कॉलेजेसची संलग्नता रद्द करणयचा निर्णय याच हेतूने घेतला आहे', असे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे म्हणाले.
क्षणचित्रे
-विद्यापीठ परीक्षांच्या गतिमान निकालांचे नितीन गडकरी यांनी केले कौतुक
-एलआयटीला १०० कोटी देण्यास माजी विद्यार्थी तयार, एलआयटीला अभिमत विद्यापीठ करण्यासाठी गडकरींनी पुन्हा केला आग्रह
-सुमारे ५३२ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान
-गुणवंतांमध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक
फोटो - राघव भांडारकर
आजोबांचे स्वप्न पूर्ण केले
'बी.ए., एल.एल.बी. परीक्षेत सात सुवर्णपदके व पारितोषिके प्राप्त केलेल्या राघव भांडारकर याने त्याच्या यशाचे श्रेय आजोबा आणि वडिलांना दिले आहे. तो म्हणाला, 'माझ्या आजोबांचे स्वप्न पूर्ण केल्याचा मला आनंद होतो आहे.' राघव हा नागपूर हायकोर्टात प्रॅक्टिस करीत आहे. तसेच त्याचे कुटुंबही विधी क्षेत्राशी निगडित आहे. परीक्षेत सर्वोत्तम येण्यासाठी केलेले श्रम आणि माझ्या कुटुंबीयांनी माझ्यावर टाकलेला विश्वास यामुळेच हे यश संपादित केले आहे, असे त्याने नमूद केले.
(इशू गिडवानी)
व्यावसायीक होणार
एमबीए कोर्समध्ये सहा सुवर्णपदके व पारितोषिक पटकावणारी इशू गिडवानी ही नागपुरातील एका एफएम रेडिओसोबत काम करीत आहे. तिला मार्केटिंगमध्ये पीएच.डी. करायची आहे. तसेच तिला व्यावसायिकही व्हायचे आहे. कुटुंबातील सदस्य व शिक्षकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच आजचे यश प्राप्त करता आले, असे तिने नमूद केले. थीअरीला प्रात्यक्षिक ज्ञानाची जोड अधिक देता आली तर उत्तम व्यावसायिक तयार होतील, असे इशू गिडवानी म्हणाली.
(मंगेश मेश्राम)
परिश्रमाशिवाय यश नाही
आंबेडकर विचारधारा पदव्युत्तर कोर्समध्ये सहा सुवर्णपदके प्राप्त करणारा मंगेश मेश्राम याने कठोर मेहनतीशिवाय यश मिळत नाही, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. आंबेडकर विचारधारा विषयातच पुढील संशोधन करण्याचा मानस त्याने व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या व समाजाच्या प्रत्येक अंगावर विचार व्यक्त केले आहेत. त्यातील अनेक विचार अद्यापही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यावर संशोधन करायचे असून देशाच्या आर्थिक प्रगतीला पूरक असणारे कार्य करायचे आहे, असे मंगेश मेश्राम म्हणाला.
(सप्तशृंगी मारोसकर)
प्राध्यापिका होणार
मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या सप्तश्रृंगी मारोसकर हिला प्राध्यापिका व्हायचे आहे. तिला पाच पदकांनी सन्मानित करण्यात आले. 'माझे वडील हे माझे आदर्श आहेत. त्यांनी कठीण कालावधीत माझे मनोधैर्य उंचावण्यास मदत केली. पालकांच्या सक्षम पाठिंब्याशिवाय हे यश मिळाले नसते', असे सप्तशृंगी म्हणाली. भविष्यात मराठी विषयात पीएच.डी. व नेट परीक्षा उत्तीर्ण करायचा मानस तिने व्यक्त केला.
(मुनमून सिन्हा)
पर्यावरण क्षेत्रात जागृती हवी
एमएड कोर्समध्ये सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल पाच पदकांनी सन्मानित करण्यात आलेल्या मुनमून सिन्हा ही जैवविविधता क्षेत्रात काम करीत आहे. पर्यावरणाबाबत लोकांमध्ये अद्यापही अपेक्षित जागृती निर्माण झालेली नाही. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणार आहे. लोकांना पर्यावरणाबाबत अधिक संवेदनशील करण्यासाठी बीएड नंतर एमएड कोर्स केला, असे तिने नमूद केले.