अविनाश महालक्ष्मे, नागपूर
तथागत गौतम बुद्ध आपल्या भ्रमंतीच्या काळात जवळपास महिनाभर नागपुरात वास्तव्यास होते. सिद्धार्थचा 'गौतम बुद्ध' झाल्यानंतर बुद्धांनी जवळपास विविध ८४ हजार स्थळांना भेट देऊन तेथे धम्मदेसना दिली होती. यात नागपूर आणि विदर्भातील काही गावांचाही समावेश होता. त्यांच्याच सांगण्यावरून अंबतिथ्यक नावाच्या व्यक्तीने अंबाझरी तलावाची निर्मिती केली होती. अंबतिथ्यकवरूनच अंबाझरी हे नाव पडले, असा दावा गेल्या पंधरा वर्षांपासून बुद्धकालीन स्थळांचा संशोधनात्मक अभ्यास करणाऱ्या सत्यशोधन समितीने केला आहे. त्रिपिटक, दीपवंश, महावंश, बुद्धवंश व प्राचीन भूगोल या ग्रंथांचा आधार घेऊन समितीने हा दावा केला आहे.
श्रीलंकेवरून परतताना तथागत लोकपूर (चंद्रपूर), भदवती (भद्रावती)मार्गे फणींद्रपूर, अंबाडा, नगरधन, पवनी, नागभीड या मार्गाने जाणार होते. नागपूरचे नाव फणींद्रपूर असल्याचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्येही आढळतो. तथागत भद्रावती येथे असताना भन्ते सागत यांनी बुद्धांना सांगितले की, आपण फणींद्रपूरमार्गे जाऊ नये. कारण त्या क्षेत्रात अंबतिथ्यक नावाचा क्रूर व प्रभावी व्यक्ती राहतो. त्याची त्या भागात प्रचंड दहशत आहे. त्यामुळे तुमच्या जीवाला धोका संभवतो. मात्र तथागत आपला मार्ग बदलण्यास तयार नव्हते. त्यामुळे तथागत प्रवासाला निघण्यापूर्वीच भन्ते सागत यांनी नागपूर गाठले आणि अंबतिथ्यकची भेट घेऊन बुद्ध तत्त्वज्ञानाने त्याचे मतपरिवर्तन केले.
अंबतिथ्यकाला भगवान बुद्धांना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली. ज्याच्या शिष्याच्या विचारांनी आपले मनपरिवर्तन झाले. त्या बुद्धाचे व्यक्तिमत्त्व किती प्रभावी, असेल असा प्रश्न अंबतिथ्यकाला पडला. त्यामुळे प्रत्यक्षात तथागत नागपूरला आले त्यावेळी अंबतिथ्यकाने त्यांचे जंगी स्वागत केले. जवळपास महिनाभराच्या वास्तव्यात बुद्धांनी येथे धम्मेदसना दिली. येथील नागलोक व अंबतिथ्यकाने या भागातील अनेक प्रश्नांवर बुद्धांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी राजा, प्रजा यांच्या सहकार्याने व एकोप्याने दुष्काळावर मात करण्यासाठी एखादा जलसाठा निर्माण करावा अशी सूचना केली.
शहराच्या पश्चिमेस उंच पठारावरून दोन झरे वाहात होते. अंबतिथ्यकाने या झऱ्यांना बांध घातला. तलावाची निर्मिती झाली. या काळात बुद्ध नागपुरातच वास्तव्याला होते. अंबतिथ्यक नावावरूनच या तलावाला अंबाझरी नाव पडले. हा तलाव बुद्धकालीन असल्याचे समितीचे संयोजक धर्मेश नागमित्र यांचे म्हणणे आहे. यासंबंधात समितीने पुरातत्त्व विभागालाही कळविले आहे. नागमित्र यांच्यासह जीवन दुपारे, निशिकांत वांद्रे, सुरेश अलोणे, सुरेश जिंदे, प्रकाश मेश्राम, दिलीप मेश्राम, सचिन लोखंडे, गुणानंद वंजारी, देवीदास टेंभुर्णे, अमित झोडापे, संजय वाकडे, अशोक ब्राम्हणे, राजरतन भगत, राजू थूल, क्षितिज पाटील हे समितीचे सदस्य विविध स्थळांवर जाऊन अभ्यास करीत आहेत.
अंबाझरी तलावाच्या बंधाऱ्यावर स्वामी विवेकानंद यांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे. त्याला आमचा विरोध नाही उलट समर्थन आहे. कारण विवेकानंदांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान मांडले. मात्र या तत्त्वांचा फारसा प्रचार केला जात नाही. त्यामुळे विवेकानंदांचा पुतळा उभारला जावाच, सोबतच बुद्धांच्या उपस्थितीत हा तलाव झाला असल्याने मध्यभागी हैद्राबादच्या हुसेन सागरच्या धर्तीवर भगवान बुद्धाचा पुतळा उभारावा.
- धर्मेश नागमित्र, संयोजक, सत्यशोधन समिती
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट